स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य

0
8

भंडारा : स्वतंत्र विदर्भाचा लढा फार जुना आहे. नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या २३ टक्के नोकर्‍या विदर्भातील युवकांना द्यावयाच्या होत्या. केवळ ८ टक्क्यावर समाधान केले. नोकरीतील अनुशेष, सिंचनाचा अनुशेष, भारनियमन वैदर्भीय जनतेच्या वाट्याला, हा अन्याय आम्ही कुठपर्यंत सहन करणार? हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक अँड. वामनराव चटप यांनी केले.
सिंदखेडराजा ते कालेश्‍वर गडचिरोलीदरम्यान आयोजित विदर्भ गर्जना यात्रेचे आज शनिवारला पवनी, अड्याळ, भंडारा, मोहाडी, तुमसर शहरात उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. पवनीत सौरभ दिवटे, जिल्हा समन्वयक मधूकर कुकडे, अँड. पद्माकर टेंभुर्णीकर, विलास काटेखाये, रंजना गागंर्डे, दुर्वास धार्मिक, रमांकात पशिने, विजय राजदेरकर, भक्तराज गजभिये, लोमेश वैद्य, पालिका उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर यांनी स्वतंत्र राज्य निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लढा द्यावा लागेल असे मत मांडले. संचालन डॉ. अनिल धकाते यांनी केले.
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आजवर जेव्हा-जेव्हा समोर आला त्यावेळी भाजप अग्रेसर राहिली होती. परंतु राज्यात सत्तेवर येताच भाजपने विदर्भाच्या मुद्याला बगल देत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते आहोत असे सांगत सर्मथन देतात आणि दुसरीकडे अशा आयोजनाकडे पाठ फिरवून त्याचा विरोध करण्याचा प्रकार आज आलेल्या विदर्भ गर्जना यात्रेदरम्यान दिसून आला. ही यात्रा शनिवारला भंडारा, तुमसर विधानसभा मतदारसंघातून मार्गस्थ झाली. जिल्ह्यात तिन्ही आमदार भाजपचे आहेत. ठिकठिकाणी विदर्भ गर्जना यात्रेची सभा झाली. परंतु एकाही सभेत जिल्ह्यातील आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्यांना सहभागी व्हावेसे वाटले नाही. त्यावरुन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाचा कळवळा दिसून येतो.
भंडारा शहरात यात्रेचे दुपारी २ वाजता आगमन झाले. यावेळी डॉ. रमेशकुमार गजबे म्हणाले, विदर्भ हा पूवीर्पासून निसर्गदत्त संपत्ती व साधनांनी परिपूर्ण आहे. विदर्भाच्याच भरोश्यावर महाराष्ट्राची शान आहे, नोकर्‍यांची टक्केवारी कमी, बजेटमध्ये निधी कमी दिला जातो. कुपोषण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहे. हे मागासलेपण दूर करून जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन केले.