‘अंनिस’ने केला भोंदूबाबाचा भंडाफोड

0
8

भंडारा,दि.03ः-दैवी शक्ती असल्याचा दावा करून काही दिवसांपासून पवनी तालुक्यातील रामनगर (डोंगरगाव) येथे दरबार भरविणार्‍या एका भोंदूबाबाला अड्याळ पोलिसांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास अटक केली. मअंनिसच्या तक्रारीवरून सदर कारवाईकरण्यात आली.
भगवान गणेश कोहाड (३५) रा. लहरीबाबा वॉर्ड असे या भोंदूबाबाचे नाव आहे. स्वत:ला भगवान समजून काही महिन्यांपासून त्याने रामनगर डोंगरगाव येथे दरबार भरविला होता. दैवी शक्तीचा दावा करीत तंत्रमंत्र, चमत्कार करून रोगदुरूस्ती, पुत्रप्राप्ती आदींचे आमिष देत होता. तसेच भूत, प्रेत, शांती करण्यासाठी प्रसाद व अंगारा देत होता. दरबारात येणार्‍या भोळ्याभाबड्या नागरिकांकडून दक्षिणा उकळत होता. ढोंगीबाबाने आंघोळ करून अंगावरून खाली पडलेले पाणी तिर्थ म्हणून महिला पित होते. ते पाणी प्यायल्यामुळे सर्वरोग बरे होतात. स्त्रीयांना संतती होते, अशी भावनिक कल्पना पसरवून लोकांच्या मनात अंधश्रध्दा निर्माण करण्याचे कार्य जोमात सुरू होते. याबाबत कुणीही काही बोलले तर वाईट परिणाम होईल, अशी भीती दाखवून दहशत निर्माण केली असल्याने या ढोंगी बाबाच्या विरोधात कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष कार्यवाह चंद्रशेखर भिवगडे, प्रधान सचिव कन्हैया नागपूरे, जिल्हा कार्याध्यक्षविष्णूदास लोणारे, अश्‍विनी भिवगडे यांनी दरबारात दोनवेळा भेट दिली. ढोंगी बाबा लोकांची दिशाभूल करून देव व धर्माच्या नावावर फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तक्रारीसोबत श्रद्धेच्या नावावर जनतेची आर्थिक व मानसिक फसवणूक करतानाचे दरबारात घेण्यात आलेले छायाचित्र, चमत्काराविषयी लेखिका वंदना शिवशंकर निखारे यांची पुस्तक तसेच बँक खात्यात १00 रुपये लोकांना जमा करण्याचे परिपत्रक जोडण्यात आले. दरम्यान, अड्याळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे, पोलीस कर्मचारी तसेच कार्यकर्ते त्रिवेणी वासनिक, लिलाधर बन्सोड, पुरुषोत्तम गायधने यांनी दरबारात धडक दिली. यावेळी अंनिसच्या वतीने दैवी चमत्काराने पुत्र प्राप्त करून दाखवा व २१ लाख रुपये मिळवा, असे आवाहन केले असता ढोंग करीत असल्याचे त्याने सांगितल्याने अटक करण्यात आली.