मेंढा (लेखा)वासीयांनी केला सामूहिक सेंद्रीय गटशेतीचा संकल्प

0
18

गडचिरोली,दि.07ः-जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथील प्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांच्या नेतृत्वात नागरिकांनी जागतिक मृदादिनी वैयक्तिक शेतीऐवजी सामूहिक सेंद्रिय गटशेती करण्याचा संकल्प करून नव्या अध्यायास सुरुवात केली आहे.
बुधवारला झालेल्या या सभेला ग्रामसभेचे अस्थायी अध्यक्ष मनिराम दुगा, गावपुजारी शिवदास तोफा, प्रा.डॉ.कुंदन दुफारे, तालुका कृषी अधिकारी एन.जी.बडवाईक, कृषी सहायक जे.एस.भाकरे उपस्थित होते. या सर्वांनी सामूहिक गटशेतीचे काय फायदे आहेत, याविषयी माहिती दिली.
मेंढा येथील नागरिक कित्येक वर्षांपासून आपल्या उदरनिर्वाहाकरिता सामूहिक सेंद्रीय शेती करतात. परंतु आता व्यापारी दृष्टिकोनातून बागायती शेती करायची आणि विषमुक्त उत्पादन ग्राहकांना द्यायचे, असा संकल्प मेंढा (लेखा) येथील गावकर्‍यांनी केला. त्यासाठी शासनाच्या गटशेतीविषयक योजनेला लाभ घेण्याचेही ठरविण्यात आले.
शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या मेंढा गावात ३00 एकर शेती असून, १0५ कुटुंब आहेत. शंभर एकराचा एक गट याप्रमाणे तीन गट तयार करण्यात आले आहेत. ग्रामसभा ४0 टक्के, तर केंद्र शासनाच्या ६0 टक्के अनुदानातून शेतीचा खर्च करण्यात येणार आहे. उत्पादनातून खर्च वजा करता १0 टक्के हिस्सा ग्रामसभेकडे जमा होईल व उर्वरित रक्कम व्यक्तीगत कामानुसार प्रत्येकाला मिळेल. रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात गटशेती करण्यात येणार असून, या उपक्रमाचा व्यक्ती व गावाला फायदा झाल्यास हा उपक्रम सतत सुरु ठेवू, असा निर्धार गावकर्‍यांनी केला.
या गटशेतीच्या माध्यमातून कृषी प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया व विपणन, शेतीपूरक व्यवसाय, पशुधन, गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस, कांदाचाळ इत्यादी बाबीही पुढे गावात दृष्टीपथास येणार आहेत.मेंढा(लेखा) हे गाव सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे, तसेच निस्तार हक्क, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व बांबू विक्री व अन्य विधायक कामांसाठी आधीच प्रकाशझोतात आले आहे. आता त्यात ग्रामसभेला मेंढा (लेखा) वायासीयांनी केलेला सामूहिक सेंद्रीय गटशतीचा संकल्प करून विषमुक्त गटशेतीची भर घालण्यात येणार असल्याने पुन्हा मेंढा (लेखा) हे गाव अभ्यासकांना खुणावण्यासाठी सज्ज झाले आहे.