१०८ पोलिसांना विशेष सेवा पदक वितरीत

0
12

गोंदिया,दि.10 : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्यात आला. विशेष म्हणजे, ज्यांना हे पदक जाहीर झाले आणि त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती आहे त्याच ठिकाणी हे पदक देवून सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर शहरचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम, नक्षल विरोधी अभियान नागपूरचे शरद शेलार, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, गोंदिया जिल्ह्याचे पहिले पोलीस अधिक्षक टी.बी. देवतळे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, आमगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज जिंदल, बिरसी विमानतळचे सचिन खंगार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आटोळे उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून गोंदिया पोलिस विभागाने दोन वर्षापूर्वी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची माहिती व प्रस्ताव मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. त्यानुसार, शासनाने गोंदिया जिल्ह्यात कार्य करणाऱ्या ३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना खडतर सेवेचा पुरस्कार जाहीर केला.
यातील एक सहायक पोलीस निरीक्षक व ५७ पोलीस कर्मचारी सध्या गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर ५० अधिकारी-कर्मचारी बदलून गेले आहेत. बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी पोलीस परेडमध्ये सदर पदक त्यांना देवून सन्मानीत करण्यात आले. या पदकासाठी गोंदिया जिल्ह्यात सेवा दिलेले सात पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व ७७ कर्मचारी अशा १०८ लोकांची निवड करण्यात आली. राज्यात गोंदिया व गडचिरोली सोडून काम करणाक्तया पोलीस अधिकाऱ्यांना या दोन जिल्ह्यात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणृून शासनाने खडतर सेवेचे पदक देण्यात आले आहे.