स्वाईन फ्लूने पोलिसाचा मृत्यू

0
27

चंद्रपूर- घुग्गुस पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारी गुरुवारी रात्री स्वाईन फ्लूने दगावला. अशोक मुंडके(५३) असे मृताचे नाव आहे.
बाबूपेठ येथील रहिवासी असलेले अशोक मुंडके हे घुग्गुस पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार पदावर कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना येथीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी, सावली तालुक्यातील दोघांचा या आजाराने बळी गेला आहे. त्यानंतर प्रशासनाने जनजागृती शिबिरांचे आयोजन केले. मात्र जिल्ह्यात पाहिजे तशा उपाययोजना अद्यापही झाल्या नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. विदर्भात स्वाईन फ्लूने हाहाकार माजविला आहे. दररोज प्रत्येक जिल्ह्यात रूग्णांचे मृत्यू होत आहेत.