तीन कर्जबाजारी शेतकर्‍यांची आत्महत्या

0
63

यवतमाळ/अकोला/बुलडाणा : सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे यवतमाळ, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील दडपापूर येथील शेतकरी भुतू विठुजी मसराम (४५) याने तलावात आत्महत्या केली. गुरूवारी त्याचा मृतदेह तलावात आढळला. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर सोसायटीचे एक लाख ५0 हजार रुपये कर्ज आहे.नापिकीमुळे कर्जाची चिंता होती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या मागे पत्नी, तीन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.
आत्महत्येच्या दुसर्‍या घटनेत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील शेतकरी दयाराम घटे यांनी गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापिकी आणि सोसायटीचे ६0 हजार रुपयाचे कर्ज यामुळे घटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे.
आत्महत्येची तिसरी घटना बुलडाणा जिल्ह्यातील कुलमखेड येथे घडली. ज्ञानेश्‍वर पुंडलिक कानडजे (४५) या शेतकर्‍याने गुरुवारी रात्री विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापीकी, जमीन आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते.
यामध्ये महाराष्ट्र बँकेच्या चांडोळ शाखेचे ५0 हजार रूपये कर्ज असल्याची माहीती आहे. कर्जापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, आई वडिल असा आप्त परिवार आहे.