भाषा साहित्य व संस्कृतीचे मुडदे माध्यमांनी पाडली-डॉ. श्रीपाद जोशी

0
13

भंडारा,दि.25ः-माध्यमे आपली जबाबदारी टाळत आहेत. या माध्यमांना केवळ चटपटीत असेच हवे असते. सध्या माध्यम सम्राटांची ठेकेदारी सुरू आहे. चित्रपट, नाट्य, शिल्प, चित्र, अर्थकारण, राजकारण याबाबत आपण निरक्षरच राहिलो. भाषा, साहित्य व संस्कृतीचे मुडदे याच माध्यमांनी पाडली आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
भंडारा येथे आयोजित डॉ. अनिल नितनवरे स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विदर्भसाहित्य संघ शाखा भंडारा, सार्वजनिक वाचनालय भंडारा व युगसंवाद वाड:यमीन आणि सांस्कृती संस्था भंडाराच्या संयुक्त विद्यमाने इंद्रराज सभागृह येथे डॉ. अनिल नितनवरे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, प्रमुख वक्ते अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विदर्भसाहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्व्यक प्रदीप दप्ते, कथाकार वसंत वाहोकर, विसा संघाचे कोषाध्यक्षप्रदिप मुन्शी, प्रदिप मोहिते उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘भाषा साहित्य व संस्कृती- एक दृष्टीक्षेप’ या विषयावर बोलताना डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी पुढे म्हणाले, आजची मराठीतील मोठमोठी संमेलने कुणाच्या आर्शयाने चालतात, हे सर्वांना माहित आहे. मग अशा आर्शयदात्यांच्या दबावाखाली सारं करावं लागतं. जर अ. भा. मराठी साहित्य महामंडळाकडे स्वत:चा निधी असता तर यवतमाळचे साहित्य संमेलन आम्हाला सहज यशस्वी करता आले असते. अशा साहित्य संमेलनासाठी निधी असावा व तो मराठी प्राध्यापकांनी, मराठी माणसांनी द्यावा यासाठी मी सर्वांना आवाहन केले होते. जोपर्यंत मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी मराठी माणूस जागा होत नाही. त्याची अस्मिता जागी होत नाही. तोपर्यंत मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळणार नाही. दक्षिणेतील कन्नड, मल्याळम, तामिळी तसेच बंगाली भाषिकांनी आपली सक्ती दाखविली आहे.
भाषेची बोलीची व संस्कृतीची महती जाणणारे एकमेव नेते म्हणजे राम मनोहर लोहिया होते. पहिले प्रधानमंत्री नेहरू, महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांना या गोष्टीची महती कळली होती. आपल्या भाषेत रोजगार निर्माण झाले पाहिजे. भाषेच्या विकासाला संधी उपलब्ध करून द्यायला हवी. मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम हवा, मोठय़ा साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा साहित्य संमेलनाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून धनंजय दलाल यांनी विदर्भसाहित्य संघाचे संमेलन भंडारा येथे घेण्याची घोषणा केली. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव यांन तर संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. कविता व संदेश वाचन विवेक कापगते, प्रा. आशा काटेखाये यांनी केले. आभार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बासप्पा फाये, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, डॉ. के. एल. देशपांडे, अमृत बन्सोड, प्रल्हाद सोनेवाने, हर्षल मेर्शाम, बे. तु. आगाशे, प्रधान, निळकंठ रणदिवे, मनोज केवट, घनश्याम कानतोडे यांनी पर्शिम घेतले.