कुपोषणमुक्त बालक व चांगल्या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे-नितीन मोहुर्ले

0
10

वाशिम, दि. 29 : गावातील अंगणवाडीत शिक्षण घेणारी बालके ही देशाचे भविष्य आहे. ही बालके सदृढ राहावी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) नितीन मोहुर्ले यांनी केले.26 जानेवारी रोजी कारंजा तालुक्यातील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवडलेल्या शेवती या गावी आयोजित ग्रामसभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. मोहुर्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदा जाधव होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, मंडळ कृषी अधिकारी श्री. भगत, उपसरपंच पार्वताबाई देवळे यांची उपस्थिती होती.

      श्री. मोहुर्ले पुढे म्हणाले, गावातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीतून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येते. आपली बालके भविष्यात चांगली शिक्षण घेवून मोठया पदावर गेली पाहिजे ही स्वप्न पालकांनी बघीतली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांचा शिक्षणाचा पाया अंगणवाडीत भक्कम करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य  करावे. आपले बालक कुपोषीत राहणार नाही यासाठी घरी चांगला आहार दयावा. तसेच अंगणवाडीतून मिळणारा आहार देखील नियमित दयावा असे सांगितले. यावेळी त्यांनी कुपोषणमुक्ती, आहाराच्या पध्दती व त्याचे महत्व उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिले. अंगणवाडी डिजीटल होणार असल्यामुळे बालकांना चांगले शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

      श्री. खडसे म्हणाले, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात शेवती गावाची निवड झाल्यामुळे विकासाला गती मिळणार आहे. या अभियानात राज्यातील एक हजार गावे निवडयात आली आहे त्यामध्ये या गावाचा समावेश असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने इथले ग्रामस्थ्‍ भाग्यशाली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत असल्यामुळे भविष्यात अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी या गावामध्ये झालेली असेल. शाश्वत विकासातून हे गाव सामजिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम झालेले दिलेस असे त्यांनी सांगितले.

      श्री. मानकर म्हणाले, गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. अभियानातून शाळा डिजीटल झाली आहे. सौर उर्जेतून वीजेची व्यवस्था करण्यात असल्यामुळे वीज बील भरण्याचा आणि वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्नच भविष्यात उदभवणार नाही. डिजीटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहे. त्यांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण येथून मिळणार असल्यामुळे चांगले विद्यार्थी घडण्यास मदत होईल. गावातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील एकही बालक हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता गावतील प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहजे, असे ते म्हणाले.

      श्री. राठोड म्हणाले, ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. देवचंडी तलावावरुन गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. वॉटर एटीएमसुध्दा लवकरच येथे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शुध्द व स्वच्छ पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यावर गावात जलजन्य आजाराला आळा बसेल. ग्रामस्थांचा त्यामुळे आरोग्यावर होणारा अनाठायी खर्च वाचण्यास मदत होईल. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे देवचंडी आणि शेवती गावाच्या मागील बाजूला असलेल्या तलावातून गाळ काढण्यात येईल तसेच नाला खोलीकरण व आवश्यक तेथे पांदण रस्त्याची कामे करण्यात येतील असे  सांगीतले.

      यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना व्हावी व त्या माध्यमातून ग्रामस्थांनी योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने काढलेल्या घडीपुस्तिका यावेळी सरपंच श्रीमती जाधव यांना श्री. मोहुर्ले, श्री. खडसे, श्री. मानकर, श्री. राठोड यांनी सुपूर्द केल्या. उपस्थित ग्रामस्थांना या घडीपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. ग्रामसभेला अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती जटाळे, कृषी सहायक उपाध्ये, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या यावेळी मांडल्या. या समस्यांची निश्चितपणे सोडवणूक करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले. प्रास्ताविक ग्राम सचिव सतिश वरघट यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक बी.आर. राठोड यांनी मानले.

किनखेड, वाई, लोहारा, वढवी येथे ही ग्रामसभा संपन्न

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील किनखेड, वाई, लोहारा, वढवी येथे ही 26 जानेवारी रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मुक्काम गाव बैठक व लोकसंवादातून ग्रामसभा संपन्न झाल्या.  वढवी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दत्तात्र्य निनावकर, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक वासु डोने, वन अधिकारी अशोक वायाळ यांची उपस्थिती होती. गावातील सर्व कुटूंबांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिल्याचे सांगीतले. तसेच या अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती श्री. ढोणे यांनी दिली. बँकांच्या विविध प्रश्ना विषयी श्री. निनावकर यांनी माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांनी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल तसेच बँकांकडून कर्ज देण्यास होत असलेल्या विलंबा बाबत माहिती देवून गावातील इतरही समस्या मांडल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

      वाई येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गहेरवार, जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक श्रीमती सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच लोहारा व किनखेड येथे देखील ग्रामसभेचे आयोजन करुन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.