नागपूर – नागपूर जिल्हा परिषदेचा सन 2015-16 या आर्थिक वर्षासाठी 35 कोटी 40 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व आरोग्य शिबिर या दोन नवीन योजना आणून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला.
नियमानुसार समाजकल्याण व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना प्रत्येकी 20 टक्के, महिला व बालकल्याण विभागास 10 टक्के व अपंग कल्याणाकरिता 3 टक्के, अशी एकूण 53 टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली. इतर नऊ विभागांसाठी उर्वरित 47 टक्क्यांमधून तरतूद आहे. अर्थसंकल्पात सर्वाधिक कमी तरतूद आरोग्य, कृषी आणि शिक्षण विभागासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत असताना कृषी विभागासाठी 1 कोटी 83 लाख रुपयांची तरतूद केली, तर आरोग्य विभागासाठी केवळ 45 लाख रुपये देण्यात आले. अध्यक्ष निशा सावरकर यांनी आपल्या धानला गावात नाली, रस्ते आणि इतर कामांसाठी 15 लाख रुपये, तर उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या कन्हान सर्कलमधील केवळ जुनी कामठी या गावासाठी 45 लाखांची तरतूद करून घेतली. उकेश चव्हाण यांनीही स्वत:च्या बेलोना गावासाठी 30 लाख वळते करून घेतले. विरोधी गटनेते मनोहर कुंभारे, शिवकुमार यादव, मनोज तितरमारे, नाना कंभाले, उज्ज्वला बोढारे, नंदा नारनवरे आणि कॉंग्रेसच्या अन्य सदस्यांनी सायकलसाठी निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली. किशोरवयीय मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांच्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 50 लाख रुपये सायकलसाठी वळते करण्याचा निर्णय घेतला.