नागरा तिर्थक्षेत्रातील विकास कामांची आमदार अग्रवाल यांनी केली पाहणी

0
17

गोंदिया,दि.01 : प्राचीन शिव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या जवळील ग्राम नागरा तिर्थक्षेत्र येथे सुरू असलेल्या विकास कामांची आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी (दि.२८) पाहणी करून आढावा घेतला.विशेष म्हणजे, नागराच्या विकासासाठी पुन्हा १५ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.
आमदार अग्रवाल यांनी सोमवारी (दि.२८) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून त्यांचा आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मंजूर कामांची माहिती ही घेतली. याप्रसंगी त्यांनी नागरा बायपासबाबत चर्चा करून लवकरात लवकर भूमिअधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. विशेष म्हणजे, बायपाससाठी आमदार अग्रवाल प्रयत्नरत असून भूमिअधिग्रहण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
याप्रसंगी सार्र्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नागरा पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी १५ कोटींच्या विकास कार्यक्रमाला राज्य शासनाने मंजूरी दिल्याचे सांगीतले.याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व खाजगी आर्किटेक यांच्याकडून दोन वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.
यासाठी २० एकर जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही प्रस्तावांबाबत चव्हाण यांनी आमदार अग्रवाल यांच्या सूचना मागविल्या असून त्यानुसार योग्य तो प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.१५ कोटींच्या निधीतून करावयाच्या विकास कामांना घेऊन तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात नागरा पर्यटन क्षेत्रात प्रशासकीय भवन, ओपन एयर आॅडीटोरियम, चिल्ड्रन पार्क, जॉगिंग ट्रॅक, सुलभ शौचालय, व्यापार संकूल, वाहन पार्कींग प्लाझासह अन्य सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी भूमि अधिग्रहण करून २० एकर जागेची व्यवस्था करण्यात आली आहे.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य रमेश लिल्हारे, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, सरपंच पुष्पा अटराहे, शिव मंदिर समितीचे अध्यक्ष रंजीतसिंह गौर, शैलेश गौर, प्रशांत लिल्हारे, राजेश नागरिक व अन्य उपस्थित होते.