पर्यटकांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात धुडगूस

0
6

चंद्रपूर : काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वन्यजीव अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.

काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असा धुडगूस घातला आहे. वनविभागाचे सर्व नियम अक्षरश धाब्यावर बसवत ताडोबाच्या आगरझरी ते कालापानी परिसरात फिरत होते. आठवडाभरापूर्वी कुठलीही परवानगी न घेता हे पर्यटक आगरझरी परिसरातल्या घनदाट जंगलात घुसले. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या बाजूला एक वाघ दिसला. त्यावेळी हे पर्यटक तर अधिकच चवताळले आणि त्यांनी गाड्या वाघाच्या मागे पुढे लावून त्याचा रस्ता अडवला. पुढे त्यांना पुन्हा ४ वाघ त्यांना दिसले. तेव्हाही या पर्यटकांनी वाघांचा पाठलाग करत मनसोक्त फोटो काढण्याचा असुरी आनंद घेतला.

या उपद्रवाची माहिती मिळाल्यानंतर ग्रीन प्लॅनेट सोसायटीने या प्रकाराची वनविभागाकडे तक्रार केलीय. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आणि शिका-यांच्या रडारवर असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झालेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी दोषींवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे.