गोंदिया ग्रंथोत्सवाला आजपासून प्रारंभ

0
17

गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय व श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्तवतीने २३ मार्चपासून येथील श्री शारदा वाचनालयातील बजाज सांस्कृतिक सभागृहात तीन दिवसीय गोंदिया ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम दिनी, २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जेष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात येईल. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, महिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक मोहन राठोड, कवयित्री अंजना खुणे, श्री शारदा वाचनालयाचे अध्यक्ष सतीशचंद्र बग्गा उपस्थित राहतील. दुपारी १.३0 वाजता स्पर्धा परिक्षेच्या युगात ग्रंथालयांची भूमिका या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४.३0 वाजता हे लिहायचे राहून गेले या विषयावर अनुभव-कथन, सायंकाळी ७ वाजता वैदर्भीय कवींच्या कवितांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता २१ वे शतक आणि महिला सबलीकरण या विषयावर महाचर्चा तर सायंकाळी ६ वाजता रंग मराठी मातीचा लोककलाकृतीचा कार्यक्रम तसेच अंतिम दिनी २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रमाण मराठी भाषा : नियम आणि लेखन या विषयावर कार्यशाळा, सांयकाळी ५ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या अध्यक्षतेत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे, जिलहा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे व राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या मिर्झा एक्स्प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.