अतिदुर्गम लाहेरीला भेट देत जिल्हाधिकारी व एसपींनी एैकल्या समस्या

0
16

गडचिरोली,दि.24ः- छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन गावातील नागरिकांच्या समस्या एैकून घेतल्या.यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, तहसीलदार कैलाश अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनावणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे, मुख्याध्यापक ए. डी. ठमके, पोलिस उपनिरीक्षक राजू सोनपितरे, अविनाश नडेगावकर, सरपंच पिंडा बोगामी, माजी सरपंच सुरेश सिडाम, लक्ष्मीकांत बोगामी व गावकरी उपस्थित होते.
लाहेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २२ ते २४ एप्रिलपर्यंत कैवल्य एज्युकेशन फाऊंडेशन, पोलिस प्रशासन तथा भामरागड शिक्षण विभागातर्फे लाहेरी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी बाल निवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी वीर बाबुराव शेडमाके जात प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे, नव्याने सुरू झालेली बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेची पाहणी केली. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यात यावे, असे निर्देश बॅंक अधिकार्‍यांना दिले.
त्यानंतर गावातील लोकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गावातील लोकांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी सिंह यांनी दहा ते पंधरा दिवसात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन गावकर्‍यांना दिले. जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम भागाला वारंवार भेट देऊन जनता व प्रशासनात नवे नाते जोडण्याचे काम जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे दोन्ही अधिकारी करीत आहेत.याअगोदरसुध्दा जिल्हाधिकार्‍यांनी भामरागड तालुक्यातील तसेच एटापल्ली तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. कसनासूरसारख्या गावाला दत्तक घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.