वाळूतस्करी करताना ९ ट्रॅक्टर जप्त

0
13

चंद्रपूर,दि.29ः-तालुक्यात अवैध वाळू उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे वाळू माफियांना अभय मिळत आहे. दरम्यान, घुग्घुस परिसरात अवैध वाळू तस्करी करणार्‍या नऊ ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे अवैध वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर तालुक्यातील नदी, नाल्यांमधून अवैध वाळू तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
वाळू तस्करांवर राजकीय कृपाछत्र असल्यामुळे वाळू तस्करी सुरू असून, खुलेआम वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळेस वाळू तस्करी केली जात आहे. महसूल विभागाने वाळू तस्करांवर आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पाळत ठेवून कारवाई केली होती. त्यामुळे काही महिने तस्करीवर आळा बसला होता. मात्र, आता पुन्हा वाळू तस्करी सुरू झाली आहे. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करीत नऊ ट्रॅक्टर जप्त करून दंड ठोठावला आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.