जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

0
19

यवतमाळ : घाटंजी पंचायत समिती गटविकास अधिकारी उत्तम मानकर यांना मारहाण झाली. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी यवतमाळात उमटले. जिल्हा परिषदेतील संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी घटनेचा निषेध करत संरक्षणासाठी जिल्हा कचेरीवर धडक दिली. घाटंजीच्या घटनेची आरोपीने कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.

घाटंजीचे गटविकास अधिकारी उत्तम मानकर यांना आरोपी प्रशांत धांदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली. याप्रकरणात मानकर यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांच्या कक्षात सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनातून केली. शिवाय घाटंजी प्रकरणातील आरोपींनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशीही मागणी केली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहाड, मुख्य लेखा वित्ताधिकारी सुरेश शहापूरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, कृषी विकास अधिकारी जगन राठोड, कार्यकारी अभियंता अनिल नितनवरे, महिला बाल कल्याण अधिकारी विलास मरसाळे, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे संजय गावंडे, संतोष मिश्रा, सुरेश चव्हाण, गिरीष दाभाडकर, संजय कठाळे, महसूल कर्मचारी संघटनेचे नेते रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते.