अकोला पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता निलंबित

0
12

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून करावयाच्या कामांच्या निविदाप्रक्रियेत घोळ आणि बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून परवाना देण्याचे प्रकरण भगत यांना भोवले असून, त्यांना निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी दिलेत. त्यांच्यासोबत या प्रक्रियेत दोषी असलेल्या अन्य दोन लिपिकांनाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून २0१४-१५ या वर्षाकरिता मिळालेल्या निधीतून करावयाच्या कामांची निविदा प्रक्रिया २0१४ मध्ये राबविण्यात आली होती.
ही निविदाप्रक्रिया राबविताना कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत यांनी मोठय़ा प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप करीत आमदार हरीश पिंपळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी सभागृहात ही सूचना चर्चेला आली नाही तसेच अजिंक्य कंस्ट्रक्शन कंपनीला एक कोटी रुपयांपर्यंतची कामे करण्यासाठी कंत्राटी परवाना देताना खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. याबाबत आमदार पिंपळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून मंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत आणि त्यांच्या कार्यालयातील संबंधित प्रक्रिया हाताळणारे दोन लिपिक दोषी आढळले. त्यामुळे या तिघांनाही निलंबित करण्याचे आदेश पाटील यांनी मंगळवारी दिलेत.