कवाडे, आठवले, गवई, आंबेडकर एकाच व्यासपीठावर

0
11

नागपूर – बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या वर्धापन दिनानिमित्त साधून येत्या 11 एप्रिल रोजी उपराजधानीत भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरवगळता इतर सर्व रिपब्लिकन नेते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी बाराला सीताबर्डी येथील माहेश्‍वरी सांस्कृतिक सभागृहात आगामी रिपब्लिकन ऐक्‍याच्या प्रयोगाची सुरवात होण्याची चिन्ह दिसतील. बरिएमच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ऍड. सुलेखा कुंभारे असतील. तर पीरिप नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई आणि रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माजी आमदार वामनराव चटप, अल्पसंख्यांकाचे नेते शब्बीर विद्रोही, भोई समाजाचे अ‍ॅड. दादासाहेब वलथरे, अ‍ॅड. नंदा पराते अशा विविध संघटनांचे नेतेही या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात विदर्भ राज्याची निर्मिती, इंदू मिलच्या जागेवर जागतिक दर्जाचे स्मारक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्थायी स्वरूपात मदत, महिलांची सुरक्षा, विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण यावरही चर्चा होणार असल्याचे सुलेखा कुंभारे म्हणाल्या. बाबासाहेबांचे स्वप्न व रिपब्लिकन जनतेचा विकास हे बरिएएमचे उद्दिष्ट आहे. रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणून समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय विकास होत असेल, तर चांगली बाब असल्याचे कुंभारे म्हणाल्या

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींची जयंती पर्वावर “रिपब्लिकन ऐक्‍या‘चा योग घडून यावा, हा हेतू असल्याचे ऍड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष असे की, नऊ वर्षांपूर्वी 11 एप्रिल रोजी रिपब्लिकन नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाची स्थापना झाली होती. परंतु, यावेळी सर्व रिपब्लिकन नेते एका मंचावर आले नाही. तोच प्रयत्न पुन्हा एकदा ऐक्‍यासाठी होत आहे.