घुग्घुस नगर परिषदेचा विषय वार्‍यावर

0
15

घुग्घुस : शासनाच्या निकषापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकसंख्या असेल्या घुग्घुस येथे नगर परिषद स्थापनेची मागणी १५ वर्षापासून होत आहे. यासाठी जनआंदोलन झाले. मात्र शासनाचे दुर्लक्षच होत असल्याने घुग्घुस नगर परिषद निर्मितीचा विषय सध्या वार्‍यावर दिसून येत आहे.
केंद्रात व राज्यात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणणारे कर्तव्यदक्ष मंत्री या क्षेत्राचे प्रतिनिधी आहेत. मात्र घुग्घुसवासीयांच्या मागणीला अपयशच येत आहे. येथील ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा का मिळत नाही, हा घुग्घुसवासीयांकरिता चिंतनाचा विषय ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या औद्योगिक क्षेत्रापासून शासनाला लक्षावधी रूपयांचा महसूल मिळतो. घुग्घुस गावाची लोकसंख्या १0 वर्षापूर्वीच्या जनगणनेनुसार २९ हजारपेक्षा अधिक तर २000 च्या जनगणनेनुसार ३२ हजारापेक्षा अधिक आहे. शासनाच्या निकषानुसार दहा वर्षापूर्वीच घुग्घुस नगर परिषद व्हायला पाहिजे होती. चंद्रपूर विधानसभे अंतर्गत येणार्‍या घुग्घुस गावाचे प्रतिनिधी म्हणून विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व खासदार हंसराज अहीर हे केंद्रात महत्त्वाचे खाते सांभाळत आहे. दोन्ही नेते असताना घुग्घुससारख्या गावाला नगर परिषदेचा दर्जा देण्याकरिता का दुर्लक्ष होत आहे, हा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय ठरत आहे.
घुग्घुस नगर परिषदेची घोषणा होऊन १५ वर्षापूर्वी अधिसूचना निघाली होती. तेव्हाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आजपासून घुग्घुस नगर परिषद अस्तित्वात आली, अशी घोषणा घाईगर्दीत सभेत करून टाकली आणि घुग्घुसच्या एका कार्यकर्त्याने घुग्घुस नगर परिषदेचे शिल्पकार म्हणून परिचय पत्रच छापून टाकले होते. हे घुग्घुसवासियांना माहित आहे. त्यानंतर विधानसभा, लोकसभा, जि.प. व ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणकीदरम्यान वेळोवेळी भाजपच्या नेत्याकडून आश्‍वासन मिळाले. मात्र शासन काँग्रेसचे असल्यामुळे घुग्घुस नगर परिषद होत नाही, असे नेहमीचे भाष्य करणारे वर्तमान वित्तमंत्री आता सत्तेत आहे. मग ते गप्प का, असे नागरिक विचारत आहेत. नगर परिषदेचा विषय का रेंगाळत आहे, हा चिंतनाचा विषय ठरत असून याकडे आतातरी लक्ष देण्याची मागणी आहे.