आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा दूषित पाण्याने मृत्यू

0
7

चंद्रपूर-बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेत दूषित पाणी पिल्याने सुमारे १५० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सध्या तीन विद्यार्थ्यांवर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवार, १२ एप्रिलला उघडकीस आली. या गंभीर प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा हादरली असून, आश्रमशाळा व्यवस्थापनाने या गंभीर घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत मुलांना तातडीने सुट्टी जाहीर केली.
बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथे जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित खेमाजी नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे सुमारे ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, ही आश्रमशाळा समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत आहे. या शाळेत दोन दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडणे सुरू झाले. या शाळेतील बोअरवेल काही दिवसांपूर्वी बिघडली होती आणि उपसा नसलेल्या विहिरीतून मुलांना पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळेच मुलांना हगवणीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, या प्रकाराची वाच्छता न करता आश्रमशाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. १३ एप्रिल रोजी उन्हाळ्याची सुट्टी दिली जाणार होती. मात्र, त्याआधीच सर्व विद्यार्थ्यांना तातडीने सुट्टी देत बळजबरीने घरी पाठविण्यात आल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, हिंगोली येथील रहिवासी असलेल्या गणेश शिंदे या ७ व्या वर्गातील विद्यार्थ्याला पालकांच्या स्वाधीनही केले गेले. मात्र, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूची साधी माहिती आश्रमशाळेने समाजकल्याण विभागाला दिली नाही. प्रकरण उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापनाने काही मुलांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने पालकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
पाण्याचे नमुने तपासा : मुनगंटीवार
बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेत झालेल्या दूषित पाण्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील पाण्याचे नमूने तातडीने तपासून शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. दूषित पाण्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून, शुद्ध पाणी हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याचे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.