अटल महापणन विकास अभियान विविध उपक्रमातून लोकसंवाद मोहीम

0
13

गोंदिया, दि. २९ : राज्यातील सहकारी पणन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी शासनाने अटल महापणन विकास अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत खरेदी-विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरु केले आहेत. ही कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांनी सुरु केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लाभ लोकांना मिळेल व त्यासोबतच सहकारी संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी मदत होईल.
यानिमित्ताने नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यकारी सहकारी संस्था, सरकारटोलाचे संचालक सुभाष आखरे, गोंदिया सेन्ट्रल कृषक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश गौतम, कातुर्ली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर महारवाडे यांनी अटल महापणन विकास अभियान अंतर्गत आयोजित जनजागृतीसाठी लोकसंवाद मोहीम प्रभावीपणे राबविण्यात भर देवून आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक सुद्धोधन कांबळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक मिलिंद आटे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक निबंधक अमित गोस्वामी यांनी केले.
यावेळी सर्व तालुकास्तरीय कार्यालये व संस्था यांनी अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत जनजागृतीसाठी ही मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना उपस्थित असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.