स्वातंत्र्यानंतरही बिडटोला गाव विकासापासून कोसो दूर

0
15

अर्जुनी मोर(संतोष रोकडे)दि.29ः-पंचायत समिती अर्जुनी मोर अंतर्गत सोमलपुर गट ग्रामपंचायत मधील बिडटोला हे गाव मागासवर्गीय आदिवासी गाव असून स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर विकासापासून कोसो दूर आहे. बीडटोला येथे अत्यावश्यक विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच लिलेस्वर खुणे, उपसरपंच मार्कंड बडवाईक यांनी या विभागातील आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नुसार बीडटोला या गावातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून केव्हाही कोसळून प्राणहानी व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांचे भवितव्याच्या विचार करून नवीन इमारत मंजूर करण्यात यावी. त्याचप्रमाणे येथील अंगणवाडी इमारतीला जागोजागी भेगा पडल्या असून जीर्ण इमारत केव्हाही कोसळू शकते. त्यासाठी अंगणवाडीला नवीन इमारत मंजूर करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याकरिता शाळेमध्ये हातपंप व आरओ वाटर कुलरची व्यवस्था करून देणे, गावातील अंतर्गत रस्त्यावरून पावसाचे पाणी व गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम मंजूर करण्यात यावे, मौजा बीड टोला ते भुरशी टोला या दोन गावांना जोडणार्‍या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्ता पूर्णत: उघडला असून मोठमोठे खड्डे तयार झाले व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन तर सोडाच सायकल व पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यासाठी नव्याने डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात यावा.
बिडटोला हे गाव सोमलपूर ग्रामपंचायत मध्ये येत असल्याने दर दिवशी आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी बीडटोला या गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापित करून द्यावे, ही सर्व कामे झाली नाही तर बीडटोला ग्रामवासी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार. असा इशारा उपसरपंच मार्कंड बडवाईक, ग्रामपंचायत सदस्य राहुल मेर्शाम, राजन धारगावे, विद्या बोडणे, जय माला मेर्शाम, सुनंदा वैद्य व ग्रामवासी यांनी दिला आहे.