लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा-मधुकर कांबळे

0
26

वाशिम, दि. २९ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे वंचित, श्रमजीवी घटकांची न्याय्य बाजू मांडणारे होते. तसेच त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यामुळे हे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे प्रतिपादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक मृदुला लाड, जिल्हा जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त डॉ. माया कुलाल, कुसुमताई गोपले, ज्येष्ठ साहित्यिक ना. चं. कांबळे, अनंत मुसळे, विनोद जोगदंड, श्री. गव्हाळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

श्री. कांबळे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून वंचित, शोषित घटकांचे जीवन रेखाटले. या घटकांना नायकत्व बहाल करून सामाजिक समतेचा विचार मांडला. त्यांच्या विचारांचा व साहित्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यंदा अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्री. वानखडे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून शासन वंचित घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवीत आहे. या योजना समाजातील तळागाळातील गरजू लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी श्रीमती गोपले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.