विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत करण्यासाठी क्रीडा संकुलाची निर्मिती-पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे

0
21

जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती, दि. 30 : ग्रामीण भागातील मुलांमध्ये विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कनखरता, निडरता व जिद्द आदी गुण असतात. त्यांच्यातील खेळगुणांना वाव देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे, असे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी  सांगितले.येथील विद्यापीठ परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसळ, आमदार रवि राणा, जि.प.सदस्य संजय गुलाणे, नगरसेविका जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांचेसह क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो त्यानिमित्त पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ.बोंडे म्हणाले की, जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकुल अस्तिवात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीतून शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतात. जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी शासनाद्वारे 16 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून आठ कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाला देण्यात असून उर्वरित आठ कोटी खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर केल्यावर देण्यात येईल.

श्री.बोंडे म्हणाले, जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट नेतृत्व समोर येण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आर्चरी रेंज निर्माण करण्यासाठी 5 कोटी 61 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात कबड्डी, खो-खो, धनुर्विद्या, लगोरी यासारख्या पारंपारिक खेळांना पुरस्कृत करण्यासोबतच नवीनतम ज्युदो, कराटे, मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सारख्या खेळांना मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यापुढेही खेलो इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक खेळाप्रकाराला प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या अंतर्गत मोर्शीतून कबड्डी, ज्युदोसाठी दर्यापूर, आर्चरीसाठी नांदगावपेठ तर मेळघाटमध्ये ॲथलेटीक्स सारख्या क्रीडाप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात सेमाडोह ते मेळघाट अशी राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुलींना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी स्वयंसिद्धा उपक्रम शाळा-महाविद्यालयातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच हजार मुलींनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून एक लाख मुलींना कराटे, लाठीकाठी व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी पाच कोटी रुपये निधी खर्चुन जिल्हा व तालुकास्तरावर अभ्यासिकांचे निर्मिती करण्यात येणार आहे, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असतांना नियमित अभ्यासासोबतच किमान एक तास मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सातत्य व जिद्द यासारखे गुण निर्माण होऊन त्यांचे मानसिक व शारीरिकरीत्या व्यक्तिमत्व विकास होईल. विद्यार्थ्यांनी संगणक, मोबाईलवर पबजी व इतर ऑनलाईन आभासी खेळ खेळण्यापेक्षा खरोखरचे मैदानी खेळ खेळावे. मुलांनी आभासी दुनियेत न वावरता खरोखरचे जीवनाचे सार जाणून देशावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यकमात राज्य शासनाद्वारे पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक डॉ.लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरणपटू चेतन राऊत, नेटबॉलपटू कु. स्वाती कांडलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अरुण अडसळ व आमदार रवि राणा यांचेही समयोचित भाषणे झाली.जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांविषयी  क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. यावेळी शाळा- महाविद्यालयातील स्कॉउट गाईडचे व क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

  • जिल्हा क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा
  • संरक्षक भिंत व प्रवेशव्दार, आर्चरी रेंज , जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल, विद्युतीकरण
  • अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.