आठ ग्रा.पं.त ६६ टक्के मतदाननागऱ्यात गडबड

0
11

गोंदिया : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ६६.६६ टक्के मतदान झाले. यासोबतच जिल्ह्यातील इतर आठ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका झाल्या. यादरम्यान कुठेही कोणती गडबड झाली नसली तरी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, फुलचूरटोला, चुटिया, घिवारी, कटंगटोला, नागरा व हिवरा या आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० हजार मतदार पात्र होते. याशिवाय ढाकणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३.मुंडीपार (ढा.) प्रभाग ३, किन्ही प्रभाग १, देवूटोला प्रभाग २, गोरेगाव तालुक्यातील कमरगाव प्रभाग क्र.३, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा प्रभाग क्रमांक २, बाकटी प्रभाग क्र.२ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (ख.) प्रभाग क्र.२ येथे ग्रामपंचायत प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.

सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांमध्ये मतदानासाठी चांगला उत्साह दिसून आला. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर केली होती. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या निवडणुकीत अधिक सक्रिय होऊन आपल्या कार्यकर्त्यांना कामी लावल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.