मुंडे यांच्या नावे रेल्वे विद्यापीठ स्थापण्याचे आश्वासन

0
12

नव्वी दिल्ली- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने हिंगोलीत रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केली होती. या मागणीनंतर सातव यांनी हा मुद्दा लावून धरला असून संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांना याबाबत आश्वासन देण्यास भाग पाडले आहे.

खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीत रेल्वे विद्यापीठ स्थापन करून त्याला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्याबाबत त्यांनी तसा पत्रव्यवहार मंत्रालयाकडे केला होता. लोकसभेच्या चालू अधिवेशनात सातव यांनी याच मागणीसाठी ‘कट मोशन’अंतर्गत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या खासदाराने ‘कट मोशन’अंतर्गत मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारला त्यावर मतदान घ्यावे लागते. यामुळे पेचात सापडलेल्या भाजपने सातव यांना ‘कट मोशन’ प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे रेल्वे विद्यापीठ स्थापण्याचे आश्वासन मिळाल्यास आपण प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचे सातव यांनी सांगितल्यावर मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सातव यांना विद्यापीठाबाबत प्राधान्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आणि ‘कट मोशन’वरील मतदान टळले.
सातवांच्या बाउन्सरने भाजप कात्रीत
गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करून खासदार सातव यांनी भाजपला चांगलेच कात्रीत पकडले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यास त्याचे श्रेय सातव यांनाच मिळणार आहे. यामुळे मतदारसंघातील ओबीसी आणि मागास समाजासह भाजपचे असंतुष्ट सातव यांच्याकडे वळतील आणि भाजपने विरोधच केला तर टार्गेट भाजपच होणार. सातवांच्या या बाउन्सर बॉलमुळे कात्रीत सापडलेल्या भाजपला सातव यांना ‘कट मोशन’ मागे घेण्याची विनंती करावी लागली.