26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ देवलगाव रेल्वे स्थानकावर रखडले उड्डाणपुलाचे काम

देवलगाव रेल्वे स्थानकावर रखडले उड्डाणपुलाचे काम

0
37

नवेगावबांध(सतिश कोसरकर)दिं.14ः-येथील देवलगाव रेल्वे स्टेशन वर पादचारी मार्ग नसल्यामुळे तसेच उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी वृद्ध, महिला, आजारी प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे रखडलेले काम रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरू करावे.तो तोपर्यंत तात्पुरता पादचारी मार्गाची व्यवस्था करावी. अशी मागणी नवेगावबांध परिसरातील प्रवाशांनी केली आहे.

येथील देवलगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने एका कंत्राटदाराकडून याठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू केले होते.सदर कंत्राटदाराने हे काम पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत सोडून दिले. गेल्या सहा महिन्यापासून हे काम रखडले असून, अजूनही उड्डाणपुलाचे काम सुरू झाले नाही.त्यामुळे प्रवाशांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.तिकीट घर फलाट क्रमांक एकवर आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन वरून तिकीट घराकडे जाण्यासाठी पादचारी मार्ग किंवा उड्डाणपूल नसल्यामुळे प्रवाशांना उंच अशा प्लॅटफॉर्मवरून चढावे- उतरावे लागते. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वृद्ध प्रवाशी, दिव्यांग, महिला, आजारी प्रवाशांना चढण्या उतरण्याचा त्रास सहन करून तिकीट काढण्याची कसरत करावी लागत आहे.

याबाबत रेल्वे प्रबंधक यांच्याशी संपर्क केला असता, लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू होईल पावसामुळे हे काम थांबले होते असे सांगितले.2017 पासून नवेगाव बांध येथील नागरिक रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन उड्डाणपुलाची किंवा पादचारी मार्गाची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. उलट टपाली पत्र देऊन रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल. असे आश्वासन देखील नवेगावबांध वाशी यांना दिले होते. जानेवारी महिन्या मध्ये येथील सरपंच अनिरुद्ध शहारे यांनीसुद्धा रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन, पादचारी किंवा उड्डाणपुलाची मागणी एका पत्राद्वारे केली होती. परंतु या उड्डाणपुलाची काम गेल्या सहा महिन्यापासून रखडले आहे. रेल्वे प्रशासनाने रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू करावे व प्रवाशांची ससेहोलपट थांबवावी. अशी मागणी नवेगाव बांध येथील नागरिकांसह परिसरातील प्रवाशांनी केली आहे.