चंद्रपूर,दि.15ः- औष्णिक वीज केंद्र परिसरात मागील आठवड्यात नदीमध्ये एका वाघाचे दर्शन झाले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी आता वाघाच्या जोडीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसाहतीमध्ये आता खुलेआम वाघाचे दर्शन झाल्याने कमालीची दशहत पसरली आहे. आज सकाळच्या सुमारास येथील नाल्यामध्ये एका गायीची शिकार करून त्यावर वाघाची जोडी ताव मारताना अनेक कर्मचार्यांनी पाहिले. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिवाळीनंतर सीटीपीएस कार्यालयाकडे जाणार्या नदी परिसरात एक वाघ सलग दोन दिवस दिसला. यानंतर वनविभाग तथा सीटीपीएसच्या संयुक्त पथकाला तैनात करून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली. पण त्यानंतर वाघाचे दर्शन झाले नसल्याने कर्मचार्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण सोमवारी रात्रीच्या सुमारास वाघ-वाघीनीची एक जोडी रस्ता पार करताना दिसून आली. चारचाकी वाहनांनी जाणार्यांनी व्हिडिओ शुटींग करून ती सोशल माध्यमावर प्रसारित केली. काल हा व्हिडिओ कोणत्या परिसरातील आहे, याबाबत दिवसभर संभ्रम सुरू होता. पण बुधवारी सकाळच्या सुमारास नाल्यात या वाघाच्या जोडीकडून एका गायीची शिकार करून त्यावर ताव मारताना दिसून आल्याने कर्मचार्यांची झोप उडाली आहे.
दिवसभर शिकारीचे छायाचित्र तथा व्हिडिओ शुटींग सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती वनविभागाला प्राप्त होताच एक पथक तैनात करण्यात आले असून, वाघाच्या हालचालीवर नजर ठेऊन आहेत. वाघांच्या मुक्त संचाराने रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.





