24.9 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन मेळावा

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन मेळावा

0
24

गोंदिया दि.0६ :: 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व त्यांचे पालक यांचेकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील लेक्चर हॉलमध्ये मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, जि.प.जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गोंदिया यांचे संयुक्त वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रम अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गेडाम व दिव्यांग वैद्यकीय बोर्डाचे अध्यक्ष डॉ.जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्‍यचिकित्सक डॉ.रामटेके म्हणाले, दिव्यांगाचे पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे. दिव्यांगाचे मनोबल वाढविण्यासाठी समाजाकडून प्रोत्साहन मिळावे. दिव्यांगांचा मनोबल वाढल्यास ते स्वत: सक्षम बनतील. नेत्ररोग विभागप्रमुख डॉ.राऊत म्हणाले, शासनाकडून दिव्यांगासाठी बऱ्याच योजना राबविण्यात येतात, त्या सर्व योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा तसेच योजनांमध्ये काही त्रुटी असल्यास त्यात सुधारणा करणेसंबंधी शासनास पाठपुरावा करावा यावर भर दिला. कान-नाक-घसा तज्ञ डॉ.अग्रवाल म्हणाले, कर्णबधीर प्रमाणपत्र बनविण्यासाठी जी आवश्यक तपासणी नागपूर येथे करण्यात येते ती लवकरात लवकर गोंदिया येथे उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करु, जेणेकरुन कर्णबधीर दिव्यांग बांधवांना नागपूर येथे जाण्याचा त्रास कमी होईल. मानसोपचार तज्ञ डॉ.चिरवतकर यांनी मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी, त्यांना समाजात मिळणारी वागणूक यावर मत व्यक्त करुन मानसिक दिव्यांग व्यक्ती व कुटूंबातील इतर सदस्य यांना मानसिक आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन श्री.पडोळे यांनी केले, उपस्थितांचे आभार श्रीमती भिवसाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.कुचनकर, श्रीमती काळे, श्री.खांडेकर, श्री.लांजेवार, श्री.डोंगरे, श्री.शंभरकर, श्री.महाजन, श्री.कटरे तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.