गोंदिया,दि.28ः-तिरोडा तालुक्यातील सेजगाव खूर्द येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, त्यांना उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, येथे रुग्णांवर औषधोपचासाठी लागणारी औषधीच नसल्याने नातेवाईकांवर बाहेरुन हजारो रुपयांची औषधी विकत घेण्याची वेळ आली. पीडितांमध्ये यश अमृत बिसेन (१७), अरुण किर्ती पटले (३२), किर्ती पटले (५५), किशनलाल सखाराम कावडे (५५) यांचा समावेश आहे.
फत्तेपूर खूर्द येथे सायंकाळच्या सुमारास मुख्य मार्गावर नागरिकांची ये-जा सुरु असताना अचानक एक पिसाळलेला कुत्र्याने रस्त्याने जाणाड्ढया यश, अरुण, अरुण व कितीर्ला चावा घेतला व पळ काढला. दरम्यान, नागरिकांना त्यांना जवळील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी रेबीज व अन्य औषधी देऊन उपचार सुरु केले. मात्र, पिसाळलेल्या कुत्रा चावलेल्या रुग्णांना आवश्यक असलेले ‘रॅबिज हुमन मोनोक्लोनल एंटीबॉडी’ नावाचे औषध वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी चौघांनाही पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी उपरोक्त औषधी बाहेरुन विकत आणून वैद्यकीय महाविद्यालयात औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळेस त्यांच्याजवळ महागड्या औषधी खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय टेंभरे यांना दिली. टेंभरे यांनी तत्काळ वैद्यकीय महाविद्यालय गाठून डॉक्टरांना याचा जाब विचारला व कोट्यवधी रुपयातून निर्मित या शासकीय महाविद्यालयात केवळ औषधी नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषधी आणावी लागत असल्याबाबत रोष व्यक्त केला. तसेच ही बाब केवळ महा विद्यालयाच्या अधिकार्यांसाठीच नव्हे तर क्षेत्रातील लोकप्रतिनिधींसाठी विचार करणारी बाब असल्याचे सांगितले.




