ब्रम्ह्पुरी @ ८.७ अंश सेल्सिअस
चंद्रपूर,दि.28-राज्यात उष्णतामानासाठी प्रख्यात असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्ह्पुरीचा पारा चांगलाच घसरला आहे. ब्रम्ह्पुरीकरांना सध्या घरबसल्या थंड हवेची मजा चाखायला मिळते आहे. शुक्रवारी ब्रम्ह्पुरी ठिकाणी किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअसवर आले होते. हे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. त्याचवेळी महाबळेश्वर येथे किमान तापमान १४.९ अंश सेल्सिअस हे होते हे विशेष.विदर्भात थंडीत थोडी वाढ दिसत असून ब्रम्ह्पुरी ठिकाणी किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअसवर आले होते. गोंदिया येथे त्या खालोखाल १०.५ अंश तर तापमानाची नोंद चंद्रपूर येथे १०.६ अंश सेल्सिअसवर किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर या ठिकाणी तापमान १२.६ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे.
मागील २४ तासात मध्य महाराष्ट्रात महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे, तर कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरूवात केली आहे थंडीने चंद्रपूरकरांना दिलासा दिला आहे, या आठवड्यात थंडीचा जोर वाढलाय. या गुलाबी थंडीने ब्रम्ह्पुरीकर व चंद्रपूरकरांना गारठले आहे. दरम्यान येत्या ४८ तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.





