महात्मा जोतिराव फले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा.
भंडारा दि. 1 : 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत कर्ज खत्यात अल्प मुदत कर्जाची मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली रूपये 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत हा लाभ देण्यात येणार आहे. या साठी बँकांनी संबंधीत शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन यांनी दिले.जिल्हाधिकारी भंडारा यांचे अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, मर्या. भंडारा संजय बरडे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अशोक कुंभलकर व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने शासन राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केलेली असून या शासननिर्णयान्वये सविस्तर योजनेचा तपशिल नमुद केलेला आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतक-यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पिक कर्जाची 30 सप्टेंबर 2011 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रूपये 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतक-यांचे अल्प अत्यल्प भुधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
त्यासाठी बँकांनी सबंधित शेतक-यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी, भडारा यांनी दिले आहे. तसेच बँकांनी मिशन मोडवर काम करुन 7 जानेवारी 2020 पर्यंत थकीत कर्जदार शेतक-यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करुन पात्र शेतक-यांची यादी सादर करणेबाबत बँकांना निर्देश दिलेले आहे. ज्या बँकेकडून शेतक-यांने कर्जाची उचल केली आहे त्याच बँकेच्या शाखेकडे संबंधीत शेतक-यांनी आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत, बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि भ्रमणध्वनी क्रमांक 3 जानेवारी 2020 पर्यंत न चुकता सादर करावे. यामुळे संबंधीत शेतक-यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना कुठलीही अडचण जाणवल्यास त्यांनी नजिकच्या बँक शाखेशी अथवा सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हयातील ज्या शेतक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडून कर्ज घेतले. त्यांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मध्ये जावून आधार कार्ड, पासबुकच्या आतिल पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा. म्हणजे तातडीने या योजने संबंधात माहिती सादर करणे सोईचे होईल. बँकांनी आणि त्यांच्या शाखा थकबाकीदार शेतक-यांच्या याद्या त्वरित उपलब्ध करून दिल्यास पात्र शेतक-यांना या योजनेचा लाभ देता येईल. त्यामुळे वेळोवेळी मागविण्यात येणारी माहिती उपलब्ध करुन द्यावी असे ते म्हणाले.
जिल्हयातील सर्व बँकांच्या शाखेतील दर्शनी भागात या योजनेचे माहिती फलक लावावे. यामुळे शेतक-यांना संभ्रम राहणार नाही. जर काही शेतक-यांनी या योजनेची माहिती विचारली तर त्यांचे समाधान होईल व या योजनेबाबत त्यांच्या मनात संभ्रम राहणार नाही, याची दक्षता संबंधित बँकांच्या शाखा व्यवस्थापकाने घ्यावी. गावपातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जाची उचल केलेल्या शेतक-यांचे आधारकार्ड एकत्र करण्याचे काम गटसचिवांने करावे. ज्या बँकांच्या जिल्हयात जास्त शाखा आहेत. त्यांनी दररोज पाठपरावा करुन किती बँक खाते आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित झाले आहेत, याची माहिती दररोज उपलब्ध करुन द्यावी. योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी शिबिरांचे आयोजन देखिल करावे असे आवाहन जिल्हाधिकारी, भडारा यांनी केले.जिल्हयातील शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ देण्यासाठी बँकांनी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व शासनास त्यांचा त्वरीत तपशील सादर करावा. नोडल अधिकारी यांनी सुद्धा या योजनेचा अभ्यास करून जबाबदारीने आपले कामकाज पार पाडावे असे निर्देश जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी दिले.





