सालेकसा,दि.09ः-स्पर्धेत उतरतांना जर अपयश आलं तर खचून न जाता यश संपादन करण्यासाठी कार्यात सातत्य ठेवून शिखर गाठण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे. वर्तमान युग हे स्पर्धेचे असून पारदर्शक दृष्टिकोन ठेवून पाऊल टाकणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन ठाणेदार राजकुमार डुनगे यांनी केले.ते पत्रकार दिनानिमित्त सालेकसा पत्रकार संघद्वारा आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बालकल्याण सभापती सविता पुराम होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून सालेकसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश रोकडे, बबलू कटरे, गगन गुप्ता, पि.के. गाडे, कुलतारसिंग भाटिया, नगरपंचायतचे बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, देवराम चुटे, सुरेंद्र खोब्रागडे, ब्रिजभूषण बैस,संपूर्ण स्पर्धांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षक ऍड. रंजीता खोब्रागडे, विमल कटरे, मेघा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधतांना सविता पुराम म्हणाल्या की, पत्रकारिता समाजाचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी निष्पक्षपणाने सर्वांना न्याय मिळेल या अनुषंगाने लेखणीतून लेखन कार्याचे वास्तवदर्शी कार्य करायला हवे.बबलू कटरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धा परीक्षांकडे वर्तमानातील युवकांनी लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असल्याचे वक्तव्य केले.पत्रकार दिनानिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसाच्या विद्यार्थ्यांनी मिळविला.द्वितीय क्रमांकावर जमाकुडो आश्रम शाळेचे विद्यार्थी तर तृतीय क्रमांक सालेकसा हायस्कूल सालेकसाच्या विद्यार्थ्यांना मिळाला.एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक वीना टेंभरे तर द्वितीय वैष्णवी असाटी आणि तृतीय बब्बी कोटांगले यांनी पटकावला.मॅराथॉन स्पर्धेत 87 तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला.मुलांच्या गटात सुधीर बहेकार प्रथम,द्वितीय अंकित ठाकरे तर तृतीय क्रमांक गणेश शेंडे यांनी पटकावला.मुलींच्या गटात प्रथम पूजा बिसेन,द्वितीय खुशाली बघेले व तृतीय क्रमांक साक्षी शिवणकर हिने पटकावला.कार्यक्रमाला उपस्थित अतिथींच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विविध स्पर्धांचे परीक्षण केल्याबद्दल उत्कृष्ट परीक्षणासाठी एड. रंजीता खोब्रागडे, विमलताई कटरे व मेघा ठाकूर यांना अतिथींच्या प्रमुख हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक संघटनेचे सचिव बाजीराव तरोने,संचालन पवन पाथोडे यांनी केले.उपस्थितांचे आभार संघटनेचे अध्यक्ष राकेश रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सालेकसा तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.





