बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ५ कोटी मंजूर

0
11

चंद्रपूर दि. 8 : बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महानगरपालिकांना अनुदान या शिषातंर्गत हा निधी मंजूर करण्यात असून उड्डाण पूल बांधकामाचा मार्ग आता सुकर झाला आहे.
मागील १५ ते २० वर्षांपासून बाबुपेठ येथे रेल्वे उड्डाण पुल बांधकामाची मागणी सातत्याने होत आहे. यासाठी अनेकवेळा उपोषण, आंदोलन, मोर्र्चेही काढण्यात आली. इको-प्रो तथा अनेक संस्था संघटनांनी आंदोलन उभे करून ही मागणी शासन दरबारी रेटून धरली. राजकीय स्वार्थासाठी अनेकवेळा या पुलाची मागणी मागे पडत गेली. मात्र आता या पुलाला मंजुरी मिळून निधीही मंजूर झाला आहे.
नगरविकास विभागाच्या ४ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांच्या विकास कामांसाठी विशेष अनुदान देण्याच्या बाबीअंतर्गत निधी मंजूर केला. यात बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देत नगरविकास विभागाने उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रूपये मंजूर केले. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित मागणीच्या पुर्ततेचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम चंद्रपूर पंचशताब्दी निधीअंतर्गत करण्याचे ठरले होते. कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करण्यात आले. दरम्यान वित्तमंत्र्यांनी पंचशताब्दीअंतर्गत येणारा दुसऱ्या टप्प्यातील निधी देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर या पुलासंदर्भात तर्कवितर्क लावण्यात आले. निधी कोणत्याही नावाने येणार, मात्र पुलाचे बांधकाम होणारच, असे आमदार नाना शामकुळे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.