गोंदिया ,दि.15ः: पणन हंगाम २०१९-२० मध्ये विकेंद्रीत धान खरेदी योजनेंतर्गत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात येत आहे. धानाची वेळीच भरडाई व्हावी, असा शासनाचा उद्देश आहे. त्याकरिता गोंदिया आणि भंडारा जिल्हा पुरवठा कार्यालयात प्रशिक्षित पुरवठा निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून सीएमआर गुणवत्ता नियंत्रण करून घेणे गरजेचे आहे. असे असताना देखील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण दाखवून अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांच्या आस्थापनेवर असलेल्या पुरवठा निरीक्षकांची सेवा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात घेण्यात आली आहे. त्याकरिता दोन्ही जिल्ह्यांकरिता १७ पुरवठा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गोदामात असलेल्या धानाची राईस मिलर्स मार्फत मिलींग करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप करण्याकरिता राज्यशासनाच्या डीसीपीएस योजनेंतर्गत गुणवत्ता नियंत्रकांमार्फत तांदळाची गुणवत्ता तपासण्यात येते. त्यानंतर ते तांदूळ शासकीय गोदामात जमा करण्यात येते. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत १३ पुरवठा निरीक्षक कार्यरत असताना देखील गोंदिया येथील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आपल्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे पत्र नागपूर येथील पुरवठा उपायुक्त यांना पाठविले. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याकरिता नागपूर येथील महेश ठाकूर, ललीत पाटील, सतीश नाईक, ज्ञानेश कुळकर्णी, चंद्रकांत पाटील, सचिन नन्नावरे, अमोल कांबळे, निलेश रोहणकर, विवेक जमदाळे आणि सत्यवान बांते यांची नियुक्ती केली. तसेच भंडारा जिल्ह्याकरिता नारायण सुर्वे, विनय लिखार, अभिमन्यू चऱ्हाटे, धीरज पुरी, अनिल घुगे, रविंद्र राठोड, प्रवीण वाढई यांची नियुक्ती करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे बाहेरच्या लोकांना आणि अप्रशिक्षित असलेल्यांना जिल्ह्यात बोलावून त्यांच्यावर विश्वास दाखविणे म्हणजेच जिल्ह्यातील प्रशिक्षित आणि ज्यांना भरडाई गुणनियंत्रणाचा अनुभव आहे, अशांना नाकारणे म्हणजे त्यांच्यावर अविश्वास करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
म्हणे, दरही ठरलेत
जे व्यक्ती गुणनियंत्रक म्हणून काम करतात, अशांचे प्रती लॉट प्रमाणे दर ठरले असल्याची चर्चा आहे. यात यात वरिष्ठ ते जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. प्रती लॉट २५० रुपये घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा सर्व कारभार दोन जण सांभाळत असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनाही ठेवले अंधारात
गोंदिया जिल्ह्यातील भरडाईसाठी जाणाऱ्या धानाच्या तांदळाची गुणवत्ता तपासण्याकरिता लागणारे कर्मचारी कमी असल्याने नागपूर येथील पुरवठा निरीक्षकांना पाचारण करण्यात आले. याकामी जिल्हा पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांना देखील अंधारात ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.




