सालेकसा,दि.16: तालुक्यातील आदर्श ग्राम भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तीनदिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन 17 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान करण्यात आले असून तीनदिवसीय महोत्सवात अध्यात्मिक, प्रबोधनात्मक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प गजानन दिघडे महाराज अमरावती यांचे हस्ते पुण्यतिथी महोत्सवाचे उद्घाटन होणार असून तिन्ही दिवस सकाळच्या सत्रात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. पहिल्या दिवशी सामूहिक ध्यान चिंतन, सहयोग ग्रुपच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर आणि रात्री प्रभुदास मेश्राम महाराज यांचे ग्राम गीतेवर आधारित प्रबोधनात्मक कीर्तन होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी 18 जानेवारी रोज शनिवार सकाळी सात वाजता शोभायात्रा निघेल त्यानंतर सकाळी 11:30 वाजता देशभरात प्रसिद्ध असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हा सरपंच परिषद होणार आहे सरपंच परिषदेला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर आणि तालुका प्रशासनातील जवळजवळ सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता सामूहिक प्रार्थना आणि रात्री नऊ वाजता ग्रामगीताचार्य गजानन दिघडे महाराज यांचे ग्रामस्वच्छता अभियान आणि ग्रामगीता यावर प्रबोधन होणार आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता राष्ट्रसंतांची पालखी आणि शोभायात्रा ग्रामस्वच्छता दिंडी व त्यानंतर गोपाल काला होईल. मंडळाच्या वतीने यावेळी एका जोडप्याचे विवाहदेखील लावून देण्यात येईल. समारोपीय कार्यक्रमाला आमदार सहसराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार संजय पुराम, भेरसिंग नागपुरे व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत, सूर्योदय क्रीडा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती आणि गावातील नागरिक एकोप्याने परिश्रम घेत आहेत. महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला आणि ग्राम भजेपार वासियांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून भजे पार येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ सातत्त्याने पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करत आहे यंदा या महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांनी आणि गुरुदेव उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





