भंडारा,दि.23ः-केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत लाखनी येथे लवकरच दूध पावडर वर प्रक्रिया उद्योग सुरू होणार असून ह्या संबंधीचा अंतिम प्रस्ताव दिल्लीत सादर झाला असून लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहीती खासदार सुनिल मेंढे यांनी दिली.
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात KVIC मार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा खासदारांकडून नुकताच घेण्यात आला,त्या दरम्यान ही माहिती देण्यात आली.आढावा बैठकीला खादी आणि ग्रामोद्योग आयोगातील नागपूर परीक्षेत्राचे अधिकारी डॉ.सि.पी.कापसे, डॉ.विकास लाडे,देवरे,अजय चव्हाण,गीतेश पवार,गोखले आदी उपस्थित होते.
मतदारसंघातील विविध प्रकारच्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून मेंढे पुढे म्हणाले, ” लाखांदूर येथे “लाख” निर्मितीसाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरु असून सानगडी येथे बांबू आणि उदबत्ती उद्योगवाढ अशाच पद्धतीने पोषक वातावरण तयार करण्यासाठी विस्तृत चर्चा झाली. दरम्यान मतदारसंघातील आंधळगांव, मोहाडी, पवनी येथेही पारंपरिक रोजगार निर्मितीच्या मोठ्या क्षमता असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालय द्वारे असे रोजगार करणाऱ्यांना प्रशिक्षण आणि अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार असल्याचे खासदारांनी नमूद केले.





