गोंदिया,दि. 24 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 25 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील शाळा व महाविद्यालय स्तरावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 25 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी नवीन मतदारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येईल. ज्येष्ठ मतदारांचे स्वागत व सन्मान करण्यात येईल. मतदान जागृती करणाऱ्या पथनाट्याचे यावेळी सादरीकरण करण्यात येईल. मतदान जागृती अभियानाअंतर्गत विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस व प्रशस्तीपत्र वितरीत करण्यात येईल. एन.एम.डी.कॉलेजचे प्रा.डॉ.चवरे हे राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त व्याख्यान देतील. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याबाबत शपथ घेतील.




