वाशिम, दि. 05 : राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे दरवर्षी संपूर्ण देशात विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी ७८ वी फेरी अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागामार्फत ‘देशांतर्गत पर्यटनावरील खर्च व बहुविध निर्देशांक पाहणी’ या विषयावर तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे.
पाहणीत आढळणाऱ्या निष्कर्षाचा उपयोग हा पर्यटनाचे देशाच्या आर्थिक स्थितीमधील महत्व, पर्यटनाशी निगडीत विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती, मागासवर्गीयांचा विकास यासारख्या विषयाकरिता, तसेच युनायटेड नेशन्सने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येय-२०३० च्या अनुषंगाने देशस्तरावरील काही महत्वाची निर्देशांक काढण्यासाठी करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करून आवश्यक माहिती देण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. आढाव यांनी केले आहे.




