गडचिरोली,दि.5: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन मोहिमेसाठी जिल्ह्यातुन एक तालुका निवडण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातून मुलचेरा तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुकाभरात क्षयरोगमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ही माहिती डॉ.रुपेश पेंदाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली यांनी दिली.क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून, अतिसुक्ष्म जंतूमुळे या आजाराची लागण होते. योग्यवेळी या आजाराचे निदान न झाल्यास व उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यु होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षयरोग आजाराच्या निर्मुलनासाठी केंद्र शासनातर्फे मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुका क्षयरोग मुक्त करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय, प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसभा, शाळा अशा ठिकाणी विविध क्षयरोग जनजागृती विषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातून नागरीकांना क्षयरोग व त्यावरील उपचाराबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्या मोफत करुन आरोग्य यंत्रणेमार्फत मोफत औषधोपचार देऊन महिण्याकाठी रुग्णांना पोषण आहारासाठी पाचशे रुपये बॅक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत.
क्षयरोगाचे लक्षण : क्षयरोगाची लागण झाल्यास प्रामुख्याने दोन आठवडयापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा ताप, तीन महिण्यात कमी होणारे वजन, सहा महिण्यांच्या काळात थुंकीवाटे रक्त पडणे, एक महिण्यापासून छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात.
खाजगी डॉक्टरांनी अशा रुग्णांची तपासणी करुन शासकीय आरोग्य यंत्रणेकडे याची नोंद केल्यास त्यांना पाचशे रुपये व उपचार पुर्ण झाल्याची नोंद केल्यानंतर परत पाचशे रुपये देण्यात येणार आहेत. मुलचेरा तालुका क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी समजुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली, डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली, डॉ. शशीकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली, डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली व डॉ. रुपेश पेंदाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.




