38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ मागासवर्गीय, आदिवासी शेतकरी आणि दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

मागासवर्गीय, आदिवासी शेतकरी आणि दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

0
57
  • कृषि साहित्य, झेरॉक्स मशिनचा होणार पुरवठा

वाशिम, दि. ०6 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षात २० टक्के जिल्हा परिषद सेस फंड, ७ टक्के वन महसूल व ५ टक्के दिव्यांग सेस योजनेंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना पीव्हीसी अथवा एचडीपीई पाईप पुरविणे, तुषार सिंचन संच, इलेक्ट्रिक मोटरपंप पुरविणे ह्या योजना तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी डीझेल इंजिन पुरविणे व दिव्यांगांकरिता झेरॉक्स मशिन पुरविणे ह्या योजना १०० टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर राबविण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना संबंधित पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र शेतकरी, दिव्यांग बांधवांनी २० फेब्रुवारी २०२० पर्यंत आपले परिपूर्ण अर्ज जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे यांनी केले आहे.

अर्जदार हा वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्ही.जे.एन.टी., एस. बी. सी. प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ४८ हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्द्य रेषेखालील असावा. अर्जदाराच्या नावे ३ हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी. तसेच सातबारा उताऱ्यामध्ये विहिरीची, सिंचनाची नोंद असावी किंवा शेताशेजारी नदी, नाला किंवा धरण असल्याचा तळाठ्याचा दाखला असावा. अर्जदाराने यापूर्वी समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावा. लाभार्थ्याची निवड करण्याचे अधिकारी समाज कल्याण समितीस राहतील.

लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याने साहित्य खरेदी केल्यावर सदर साहित्य तो विकणार नसल्याचे, गहाण ठेवणार नसल्याचे किंवा इतरांना भाड्याने देणार नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. इलेक्ट्रिक मोटारपंप योजनेबाबत अर्जदाराकडे विद्युत मंडळाची डिमांड कोटेशन किंवा शेतात विद्युत जोडणी असावी. दिव्यांग योजनांबाबत ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. मुसळे यांनी केले आहे.