40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना;शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना;शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास विम्याचे कवच

0
41

वाशिम, दि. ०६ : शेती करताना अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो अथवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यास २ लक्ष रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

सुधारित योजनेमध्ये वहितीधारक खातेदार शेतकरी व वहीतीधारक खातेधारक म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी किंवा पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी एक) यांना असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. १० डिसेंबर २०१९ ते ०९ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

अपघाती मृत्यू दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपयांची नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण दावा अर्ज (वारसाच्या भ्रमणध्वनी क्रमांकासह भरलेला), वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, घोषणापत्र-अ व ब अर्जदाराच्या फोटोसहीत, वयाचा दाखला (मतदान कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळेचा दाखला याची साक्षांकित प्रत), सातबारा, ६-ड, ६-क, सर्व मूळ प्रत, प्रथम माहिती अहवाल, आकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, वाहन चालविण्याचा वैध परवाना, व्हिसेरा रिपोर्ट, अपंगत्वाचा दाखला व फोटो, दोषारोपपत्र, औषधोपचाराची कागदपत्रे, अपघाताची नोंदणी ४५ दिवसाच्या आत करावी. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.