वाशिम, दि. ०६ : महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत पोषण अभियान अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य व पोषण विषयक बाबीचे प्रशिक्षण देवून त्यांचे कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी वर्धित शिक्षण पद्धती (आयएलए) प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आहे. या अंतर्गत विविध २१ प्रशिक्षण मोड्यूल्स तयार करण्यात आलेले आहेत. या मोड्यूल्सचे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि प्रकल्पस्तर अशा तीन स्तरावर आयोजित करण्याचे धोरण आहे. त्यानुसार प्रकल्प स्तरावर वाशिम बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) यांच्या स्तरावर आज, ०६ फेब्रुवारी रोजी मोड्यूल १२ आणि १३, मोड्यूल ०१ ते ११ ची उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) सुभाष राठोड, सह राज्य संसाधन गटाच्या सदस्या आचल घोडेस्वार, जिल्हा समन्वयक वाजीद मिर्झा बेग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेडाऊ, कारंजाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बांडे, मंगरूळपीरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, मुख्य सेविका सुरेखा जाधव, सुरेखा राठोड, श्रीमती घुगे, पोषण अभियान गट समन्वयक यांच्यासह नागरी भागातील ए. एन. एम., अन्य कर्मचारी उपस्थित होते.




