महाशिवरात्री यात्रा व हारुणी उर्स तयारीचा आढावा
गोंदिया, दि.7 : प्रतापगड येथे या महिन्यात होणाऱ्या महाशिवरात्रीची यात्रा आणि ख्वाजा उस्मान गणी हारूणी उर्स करीता येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.6 फेब्रुवारी रोजी प्रतापगड येथील भक्त निवास येथे येत्या 20 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणाऱ्या महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा उस्मान गणी हारूणी उर्स तयारीचा आढावा घेतांना श्री पटोले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपवनसंरक्षक एस.युवराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एसईए हाश्मी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, पंचायत समिती उपसभापती करुणा नांदगावे, तहसीलदार श्री मेश्राम व सरपंच अहिल्या वालदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री पटोले पुढे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतापगड येथे यात्रा आणि उर्स हे महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी देखील यात्रा व उर्स चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी ही बैठक यंत्रणेसोबत आयोजित करण्यात आली आहे. मूर्तीचे काम जवळपास पूर्ण होत आहे. मूर्तीच्या परिसरात सौंदर्यीकरण आणि तिथे जाण्याचा रस्ता व्यवस्थीत व्हावा यासाठी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव संबंधीत विभागाने प्राप्त करून घ्यावा व यात्रा संपल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करावे. दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळपास यात्रा आणि उर्सच्या कालावधीत दहा ते पंधरा लाख भाविक या दरम्यान येतात. त्यामुळे इथे सुविधा निर्माण करणे हे संबंधीत यंत्रणेचे काम आहे. यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्क्रीनची व्यवस्था यावर्षी करावी. यात्रेत कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही याबाबत पोलिस यंत्रणेने दक्ष राहावे. 20, 21 आणि 22 फेब्रुवारी या तीन दिवसा दरम्यान यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पाण्याचे निर्जंतुकीकरण करुन शुध्द पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात यावी असे सांगून श्री पटोले म्हणाले, पाण्याचे नमुने देखील तपासण्यात यावे. दुषित पाणी भाविकांच्या पिण्यात येणार नाही याकडे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने लक्ष दयावे. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी आरोग्य विभागाची सहा शिबीर कक्ष उभारण्यात यावे. औषधोपचार व डॉक्टर संबंधित ठिकाणी कार्यरत असावेत. आवश्यक त्या पायऱ्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावी. तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते व्यवस्थित करावेत. पार्किंगची व्यवस्थेचे देखील पोलिसांनी नियोजन करावे. वाहतुकीच्या दृष्टीने आणि यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पोलिसांनी कराव्यात. रस्त्यावर कोणीही पार्किंग करणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी. पार्किंगमध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात असे त्यांनी सांगितले.
वयस्कर भाविकांची यात्रेदरम्यान गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे असे सांगून श्री पटोले म्हणाले, प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. रात्रीच्यावेळी यात्रेदरम्यान जास्त प्रकाश देणारे एलईडी लाईट रस्त्यावर लावावेत, त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळता येईल. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभा घेऊन बारमाही यात्रेचे नियोजन कसे करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. यात्रेच्या सुविधेसाठी निधी देण्यात येईल. यात्रेनंतर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा. प्रत्येक विभागाने आपल्या सुविधा व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील आराखडा सादर करावा. यात्रेच्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते अरुंद राहणार नाही व मुख्य मार्गाने जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करावे. अर्जुनी/मोरगाव येथून भाविकांची वाहने कालव्याच्या मार्गाने यात्रेला येतात. कालव्याच्या बाजूच्या सर्विस रोडचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. कालव्याच्या बाजूला आठ किलोमीटरपर्यंतचा रस्ता कायमस्वरूपी बॅरिकेटस् लावून तयार करावा.
पर्यटनातून या भागातील रोजगाराला चालना देण्याचे नियोजन करण्यात येत आहे असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले, या भागाची सुंदरता बघून कायमस्वरूपी कामे व्हावीत. गोठणगाव ते प्रतापगड दरम्यान रस्ता व्यवस्थित करावा. यंत्रणांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करून कार्यवाही करावी. यात्रेदरम्यान परिसर स्वच्छता ठेवावी. कुठेही आग लागणार नाही याबाबत दक्षता घेऊन अग्निशमन विभागाने देखील आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यात्रेदरम्यान दुकाने लागतात ती योग्य ठिकाणी असले पाहिजे याचे नियोजन करावे. अदानी उद्योग समुहाने त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोणकोणती कामे करता येतील याचे नियोजन करावे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत बैठक घ्यावी. वनविभागाने देखील त्यांच्या उत्पादित वस्तूंचे कायमस्वरुपी इथे विक्री केंद्र सुरु करावे. दर्गा येथे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी. इथल्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अन्य लेखाशीर्षातून देखील यासाठी निधी उपलब्ध करून दयावा.
पुढील वर्षी इथली पाणीपुरवठा योजना सक्षमपणे सुरू झाली पाहिजे असे सांगून श्री पटोले म्हणाले, यात्रेदरम्यान प्लास्टिकचा वापर होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. भाविकांनी यात्रेदरम्यान तंबाखू व खर्रा खाऊ नये. यात्रेदरम्यान यात्रेच्या सहा महिने आधी जिल्हा प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची पार्किंगची व्यवस्था देखील व्यवस्थित व्हावी. यासाठी त्यांना आवश्यक त्या ठिकाणी जागा व वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. गोंदिया ते प्रतापगड दरम्यान दररोज बसची व्यवस्था करावी. ही व्यवस्था यात्रेपूर्वी झाली पाहिजे असे निर्देश यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कृषी विभागाने यात्रेच्या दरम्यान सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्टॉल लावावा. यामधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करावे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित वस्तूंची विक्री येथे कृषी विभागाने करावी. त्यामुळे जास्तीत जास्त यात्रेनिमित्त येणाऱ्या शेतकरी सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित होतील. आरोग्य विभागाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती नागरिकांना यात्रेदरम्यान द्यावी. त्यामुळे या योजनेबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल असे श्री पटोले यांनी यावेळी सांगितले.
आढावा बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, नरेश भांडारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जावेद, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे, जि.प.सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री उईके, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी तसेच तालुक्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार अर्जुनी/मोरगाव विस्तार अधिकारी श्री भावे यांनी मानले.





