.गोंदिया,दि.16 – संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजासह ईतर सर्वच समाजात अंधश्रध्दासह अनेक विषयांवर जनजागृती करून तत्कालीन समाजाला चेतविण्याचे काम केले. एकंदरीत त्यांचे काम समाजाला दिशा देणारे होते, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता श्री राठोड यांनी केले. 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल जयंती निमित्त सडक अर्जुनी पंचायत समिती येथे संत सेवालाल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री निर्वाण, विस्तार अधिकारी पंचायत श्री खुणे, कक्ष अधिकारी गौतम, राजेश उखळकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत सेवालाल महाराज यांचा जन्म बंजारा समाजात झालेला असून त्यांचे जन्म गाव तेलंगणा राज्यात आहे. आजही संत सेवालाल महाराजांना दोन्ही राज्यात मानणारा मोठा वर्ग आहे. महाराजांनी गाईच्या कळपाच्या माध्यमातून समाजात जनजागृती केली. त्यांची शिकवण आजही समाजासाठी उपयोगी ठरत आहे, असे श्री राठोड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन भागचंद्र रहांगडाले यांनी मानले.





