देवाजी तोफा यांचे हस्ते उद्घाटन
गडचिरोली,दि.16: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या अर्थसहाय्याने लेखा मेंढा येथे शाश्वत बांबू व्यवस्थापन आणि बांबू मूल्यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन देवाजी तोफा यांच्याहस्ते व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.मेंढा व चव्हेला ग्रामसभेच्या मदतीने दोन्ही ठिकाणच्या पंधरा-पंधरा स्थानिक प्रशिक्षणार्थींना या दरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमावेळी प्रा.रुपेंद्र गौर, प्रा. दुपारे सर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातल्या गावातच बांबूपासून विविध रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था व सस्टेनेबल एम्पावरमेंट अंड वेल्फेअर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. बांबू उत्पन्न मोठ्या प्रमाणात असलेल्या भागात आदिवासी प्रकल्पांतर्गत विविध प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. यामधून गावातील लोकांना स्थानिक कामातून रोजगार निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बांबू साठी मोठ्या प्रमाणात बाहेर ठिकाणाहून मागणी आहे. यातूनच आता जिल्ह्यातच बांबूपासून विविध वस्तू तयार करून त्या बाहेर विकल्या जाणार आहेत. निश्चितच स्थानिक रोजगार व आर्थिक मोबदला वाढण्यास मदत होणार आहे.





