भंडारा,दि.21:- सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे. शासकीय कार्यालयासह सर्वांनाच आता ऑनलाईन कामकाजामुळे इंटरनेट शिवाय पान हालत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विना व्यत्यय सुरु राहणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासनाने शहरी महानेट प्रकल्प सुरु केला असून या शहरी महानेट प्रकल्पाचा शुभारंभ व भूमीपूजन जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. सुधिर गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जिल्हयातील महत्वाचे शासकीय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले शासकीय कार्यालये, शाळा, शासकीय विभाग इत्यादी ठिकाणे इंटरनेटने जोडली जाणार आहेत. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टिकल इंटरनेट सुविधेअंतर्गत त्या त्या ठिकाणांना उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे.
इंटरनेट सुविधा विनाव्यत्यय व जलद गतीने मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शहरी महानेट प्रकल्पांचा शुभारंभ लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय भंडारा पासून करण्यात आला. यावेळी सुचना व विज्ञान अधिकारी संदीप लोखंडे, नगरपरिषद भंडाराचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, महा आय टी कॉपोरेशनचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक फारुख शेख, वरिष्ठ नेटवर्क अभियंता कार्तीक आकरे, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता मुकेश पाटिल, नेटवर्क अभियंता गौरव नंदागवळी, अमित नंदनवार, ईरफान आलम शेख, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. चे बिजुकूमार गोपीनाथ, राहुल दाहनकर, अनिकेत रालहुडे, राहूल मेश्राम, जी रमेश, मनोज शर्मा, रोशन तानेकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक फारुख शेख यांनी योजनेची माहिती, फायदे तसेच सामान्यसाठी होणाऱ्या लाभाची माहिती दिली. शासकीय कार्यालय, शाळा, वसतीगृह यांना अल्प दरात जोडणी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील शासकीय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस, आरोग्य शिक्षण ई-डाटा गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.
इंटरनेट वापर हा आता अनिवार्य असल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांना होणार आहे. नंतर शासकीय शाळा व इतर आस्थापनात ही महानेट सेवा सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेट सेवेची गती वाढणार असून यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजात गती मिळणार आहे.





