40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

0
106

blank

गोंदिया,दि.02 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तथा तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया मार्फत 27 फेब्रुवारीला हॉटेल सनशाईन प्लाझा सभागृहात जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड व सेंद्रीय शेती या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे तर अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे श्री खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोधन विभागाचे तांत्रिक अधिकारी संकेत सुर्यपुजारी, गोरेगावचे तज्ञ प्रशिक्षक ललीत रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनिल खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, अंकुर सिड्सचे मार्केटींग अधिकारी श्री.गौतम, डावू डूपांड लिमी.चे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोजकुमार बघेले उपस्थित होते.

जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे प्रथम सत्रामध्ये उद्घाटन प्रसंगी बोलतांना गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धान व भाजीपाला पिकावरील शत्रु किड व मित्र किड यावर तसेच ठिबक व तुषार सिंचन यावर मार्गदर्शन केले. भिमाशंकर पाटील यांनी परंपरागत कृषि विकास योजना अंतर्गत सेंद्रीय शेती व भाजीपाला लागवड तसेच शेतकऱ्यांनी भात पिकाव्यतिरिक्त भाजीपाला व कडधान्य पिके घेवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यावर मार्गदर्शन केले. धनराज तुमडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच फळबाग लागवड, तांत्रिक पध्दतीने धान लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड या विषयावर संकेत सुर्यपुजारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये शेडनेट हाऊस, पॉली हाऊसमध्ये भाजीपाला लागवड व भाजीपाल्याच्या विविध प्रजाती यावर सविस्तर माहिती दिली. श्री.खेडीकर यांनी माती परीक्षण व सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. ललीत रहांगडाले यांनी सेंद्रीय शेती या विषयावर विस्तृत माहिती दिली. संजय बिसेन यांनी गांडूळ खतावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुनिल खडसे यांनी केले. उपस्थितांचे आभार शैलेश बिसेन यांनी मानले. शेतकरी प्रशिक्षणाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतकरी मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.गौतम व मनोजकुमार बघेले यांनी सहकार्य केले.