मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त ग्रंथप्रदर्शन

0
143

गोंदिया ,दि.02 :: ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. आपल्या ज्ञान भाषेचा गौरव म्हणून कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गोंदिया येथे मराठी भाषा ग्रंथ साहित्याचे, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कोषागार अधिकारी नंदकिशोर भंडारे उपस्थित होते.

श्री.सोसे यावेळी म्हणाले, आपल्या मराठी मानसाने मराठी मानसासोबत मराठीतूनच बोलेले पाहिजे. मराठी आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे, संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळूवार प्रेमळ असतात, प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलते तशी आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषेला थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे रक्षणाचे कार्य केले. दादासाहेब फाळके ते दादा कोंडके यांना मराठी भाषेनेच घडविले असे त्यांनी सांगितले.

श्री.भंडारे म्हणाले, आजच्या आधुनिकतेच्या काळात इतर भाषेचा द्वेश करु नका पण मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेचा उपयोग दैनंदिन जीवनात केला पाहिजे. याकरीता आज स्वत: पालक, शिक्षक व समाज या तीन पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवयास पाहिजे. मराठी भाषेला देशात अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी सर्व वाचक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त सामुहिक मराठी भाषा प्रतिज्ञा घेतली. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कामकाजासाठी प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या अभ्यांगतांसाठी तळ मजल्यावर वृत्तपत्र वाचन कक्ष सुरु करण्यात आला. याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते उपस्थित होते. कार्यक्रमास कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी मानले.