कर्जमाफीच्या दुसर्‍या यादीत जिल्ह्यातील २३ हजार शेतकरी

0
231

गोंदिया,दि.02 :महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकर्‍याचे २ लाख रुपयापयर्ंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. २४ फेब्रुवारीला पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १५६ शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकर्‍यांच्या समावेश आहे. पुढील ४८ तासांच्या कालावधीत या शेतकर्‍याच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापयर्ंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील एकूण २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी पहिल्या यादीत १५६ आणि दुसर्‍या यादीत २३ हजार ३३७ शेतकर्‍यांचा समावेश असून उर्वरित ६ हजार शेतकर्‍यांची यादी मंगळवारपयर्ंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी युद्धस्तरावर शेतकर्‍यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करुन त्यांचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले.
त्यामुळे आता या शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीस पात्र ठेवलेले सर्वाधिक १५ हजार २३0 शेतकरी जिल्हा बँक तर राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या खातेदार शेतकर्‍यांची संख्या ८१0७ आहे.
एकूण पात्र शेतकर्‍यांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्हा बँकेचे १९ हजार १९१ आणि राष्ट्रीयकृत बँकेचे ९९६४ शेतकर्‍यांच्या समावेश आहे. त्यामुळे तिसर्‍या यादीत पात्र उर्वरित शेतकर्‍यांचा समावेश असणार असल्याचे जिल्हा सहकार निबंधक के. पी. कांबळे यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे खातेदार कर्जमाफीस पात्र ठरले, त्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले होते. त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले. त्यामुळे जिल्हा बँकेचे सर्वाधिक १५ हजार २३0 शेतकर्‍यांचा पहिल्या व दुसर्‍या यादीत समावेश आहे.