गोंदिया,दि.09:- तिरोडा गोरेगाव विधानसभा अंतर्गत येत असलेल्या गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव या महसुली गावाची लोकसंख्या ३०४७ असून यामध्ये किंडगीपार या गटग्रामपंचायतीचा समावेश होता.आमदार विजय रहागंडाले यांनी शासन प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुन किंडगीपार या गटगावाची लोकसंख्या १०१९ असल्यामुळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या तीन कलम ४ अन्वये डोंगरगाव ग्रा.प.चे विभाजन करून किंडगीपार या गावाला स्वतंत्र ग्रा.प.चा दर्जा मिळण्याबाब गावक-यांनी सादर केलेल्या निवेदनावर कारवाई केली.ग्रामविकास सचिव अरविंदकुमार यांची भेट घेत आमदार रहागंडालेंनी सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.तसेच सचिवानी सदर प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी प्रदान केली असून महाराष्ट्र शासन राजपत्र येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी महोदयांना प्राप्त होणार आहे. सदर ग्रा.प.चे विभाजन केल्याने भोजराज टेंभरे,हंसराज पटले,अशोक उईके,आसाराम टेंभरे, रुपलाल गौतम,रामचंद्र बिसेन यांनी आमदार महोदयांचे आभार मानले आहे.





